श्रावण म्हणजे माझाच काय, सगळ्यांचा आवडता महिना! एकतर उन्हाळ्याची तलखी दूर करणारा म्हणून आणि ग्रीष्मातल्या रखरखीत निसर्गाचं सर्वांगरूप पालटून हिरविशार दुलई पांघरून आपल्याही तनामनाचा कायापालट करणारा महिना!
पाऊस सुद्धा यावेळी धसमुसळेपण सोडून हळुवार स्पर्श धारण करतो. जणू प्रेयसीचा मुलायम स्पर्शच.
समस्त महिला वर्गाला नटून थटून हिंदोळ्यावर झुलायला लावणारा, फुगड्यांची शरीरालाच काय पण मनालाही झिंग आणणारी आवर्तनं घ्यायला लावणारा हाच तो श्रावण !
श्रावणातला पाऊस म्हटलं की एक आठवण नेहमी पृष्ठावर येते. सोलापूर- सांगोला असा प्रवास एस टी महामंडळाच्या संगतीने सुरू होता. खिडकी लावलेली असली तरी खट्याळ श्रावणसरी चेहऱ्यावर गुलाबपाण्यासारख्या शिंतोडत होत्या. नकळत समाधी लागली, आणि नंतर दिवसभर त्या धुंदीतच होतो. कामातून जशी सवड मिळेल तसं कागदावर शब्द उमटत गेले....
अस्सा पाऊस पडतो
धो धो नव्या नवतीचा
हिरव्या रंगानं मांडला
दंगा नव्या नवतीचा ||
घुमे झऱ्यांची बासरी
नभ वाजवी चौघडा
अस्सा थेंब थेंब झरे
जसा मोतीयाचा सडा ||
थेंब थेंब मोती बने साज शृंगार रतीचा ||
नभाच्या पोटातलं
आलं धरेच्या ओठात
कृष्णाचं ग रूप साचे
वेड्या राधेच्या घटात ||
अस्सा रंगला गं विडा नव्या हव्या रंगतीचा ||
मनातला श्रावण आणि शृंगार जणू लेखणीतून पाझरत गेला....
@ ----- मंदार काळे, सोलापूर
9423325755
No comments:
Post a Comment